तुळजापूर (प्रतिनिधी)- पंढरपूर येथे 2 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक-प्रवाशांच्या सोयीकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे तब्बल 1150 विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
पंढरपूर येथे चंद्रभागा बसस्थानक परिसरात दिनांक 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान या बसेस धावतील. यासाठी 17 फ्लाटसाईट्स तयार करण्यात आल्या असून, 1000 हून अधिक वाहन पार्किंगची सोय केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांसाठी निवास, अन्न व सुरक्षेची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी 24 तास यात्रेकरूंना सेवा देणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त बसेसची तयारी ठेवण्यात आली असून, ‘गाव ते पंढरपूर थेट सेवा' या योजनेतून 40 पेक्षा अधिक जादा गाड्या सोडण्यात येतील. विशेष म्हणजे, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांन साठी मोफत आणि महिलांसाठी 50 टक्के भाडे सवलत देण्यात येणार आहे. तसेच गावागावातील भाविकांना गट आरक्षण करून प्रवास करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मागील वर्षी 1,055 बसेसद्वारे तब्बल 3 लाख 72 हजार भाविकांचा सुरक्षित प्रवास करण्यात आला होता आणि त्यातून सुमारे 6 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते.
