धाराशिव (प्रतिनिधी) हैदराबाद गॅजेटच्या आधारावर शासनाकडून दिलेल्या प्रमाणपत्राची तपासणी आणि पडताळणी करून मगच दसऱ्यानंतर सरकारच्या विरोधात आपण नवा डाव टाकू अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव मध्ये केली.

90 लाख 93 हजार रुपये खर्चून धाराशिव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या स्तंभाचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री प्रताप सरनाईक, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंखे, सुधीर पाटील, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे मराठा आंदोलन चळवळीतील बलराज रणदिवे, आनंद पाटील यावेळी उपस्थित होते. अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदतीची गरज आहे.जनावरे वाहून गेली, कांद्याचे नुकसान झाले, आणि याचे पुरावे मागणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना समज द्यावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण शेतकऱ्यांची वस्तुस्थिती मांडावी आणि त्यांना विनविलंब मदत करावी. अशी मागणी ही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, ध्वज स्तंभाचे भूमिपूजन झाल्यानंतर बोलताना पालकमंत्री म्हणाले, जगातील मराठ्यांचे नेते असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो. जरांगे पाटील यांना आपल्याविषयी त्यांच्या कार्यकर्त्याकडून चांगली माहिती मिळाली आणि म्हणूनच, पहिल्यांदा ते माझ्या समवेत व्यासपीठावर आलेले आहेत याचा मला आनंद आहे. येणाऱ्या काळात मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी निवासी वस्तीगृहाची इमारत उभारण्यासाठी लवकरच जागेचा शोध घेऊन काम सुरू केले जाईल असे सरनाईक म्हणाले.

 
Top