धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर जिल्ह्यातील बऱ्याच मंडळात दोन तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे. सततचा पडत असलेला मुसळधार पाऊस पाहता धाराशिव जिल्ह्यात विशेषत: परंडा, भूम व वाशी तालुक्यात प्रथमच असा इतक्या मोठ्या प्रमाणात विक्रमी पाऊस पडला आहे. यामुळे. या तीन तालुक्यात अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली असून, या मुसळधार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच शेतीपिकांचे व फळबागांचे अतोनात पूर्णपणे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे सर्व नद्या, नाले व ओढ्यांना महापूर आला असून जिल्ह्यातील विशेषत: परंडा, भूम व वाशी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांना व वाड्या-वस्त्यांना पाण्याने वेढले आहे. त्यांचा संपर्क तुटला आहे. आपणांशी मंगळवारी सकाळी संपर्क करून या अतिवृष्टीची व अनेक ठिकाणी गाव, वाड्या, वस्त्यांना पाण्याने वेढा दिल्याने लोक अडकल्याची माहिती दिल्यानंतर आपण तातडीने लष्कराचे हेलिकॉप्टर व एनडीआरएफ ची टीम पाठवून रेस्क्यू केल्याने अनेकांची मनुष्यहानी होण्याची दुर्घटना टळली आहे.
नद्या, नाले व ओढ्यांच्या काठावरील दोन्ही बाजूंच्या शेतजमिनीची माती पूर्णपणे महापूरजन्य पूरामुळे खरडून वाहून गेल्यानेही शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात शेकडो पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच ग्रामीण भागात गावात व शहरी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पाणी घरात शिरून घरांचे व जीवनावश्यक साहित्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे तातडीने करणे आवश्यक आहे.
तरी संपूर्ण धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, मृत्यू झालेल्या पशुधनाचे, पाण्यात गेलेल्या घरांचे, जीवनावश्यक साहित्यांचे व सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन संकटग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत देण्यात यावी आणि शेतक-यांच्या खरडून गेलेल्या जमिनी पूर्ववत करण्यास शासनाने मदत करावी. अशी विनंती भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.