तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात भूम आणि परांडा तालुक्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या आपत्तीत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून जिल्हा प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बालाजी अमाईन्स लिमिटेड पुढे सरसावली आहे. कंपनीने धाराशिव जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांशी तात्काळ समन्वय साधून राशन किट्स तयार केली. प्रत्येक किटमध्ये 26 किलो तांदूळ, 30 किलो गहू पीठ, 10 किलो डाळ, 5 किलो पोहे, 5 किलो रवा, 5 किलो रिफाईन्ड तेल, 2 किलो शेंगा, 1 किलो तिखट व 1 किलो मीठ अशा एकूण 85 किलो अन्नधान्याचा समावेश आहे.

25 सप्टेंबर रोजी 1 टेम्पो मदत साहित्य कंपनीच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे अधिकारी दत्तप्रसाद सांजेकर व सचिन मोरे यांनी परांडा तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर, पुरवठा निरिक्षण अधिकारी नितिन भांडवलकर, महसूल सहाय्यक ए. बी. करपे व सौरभ गिरी यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी बोलताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले, “सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये मागे राहण्याचा प्रश्नच येत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. अश्या प्रसंगी आमचे सर्व संचालक मंडळ पुढे येवून तातडीने अन्नधान्य वितरणाचे नियोजन केले, अन्नधान्य वितरण सुरू असून पुढेही गरजेनुसार मदत साहित्य पोहोचवले जाईल,” असे ते म्हणाले. तसेच कंपनीचे कर्मचारीही आपले योगदान देत बाधितांकडे लवकरात लवकर मदत पोहोचविले त्यामुळे त्यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले. 

 
Top