तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्यावर पुन्हा आरटीओच्या  गाड्या अवतरल्या असून, कागदपत्र तपासणीच्या नावाखाली वाहनचालक व देविभक्तांची आर्थिक लूट होत असल्याची चर्चा समोर आली आहे. हा प्रकार 29 सप्टेंबर रोजी सकाळी घडला.

श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू असल्याने रोज शेकडो भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी येत आहेत. मात्र, तामलवाडी टोलनाक्यावर अचानक उभ्या राहणाऱ्या आरटीओ, महामार्ग पोलिसामुळे  भाविक त्रस्त झाले आहेत. “आम्ही दर्शनाला जावे की नाही?” असा सवाल अनेक भक्तांनी उपस्थित केला.

दरम्यान, मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अशा परिस्थितीत, मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरच भाविकांना लुटावे लागणे ही दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

पूर्वीही याच टोलनाक्यावर दोन आरटीओ गाड्यांमार्फत आर्थिक वसुली सुरू असल्याच्या तक्रारी प्रसारमाध्यमांनी मांडल्या होत्या. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गाड्या आमच्या नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली होती. त्यानंतर काही काळ हा प्रकार थांबला होता. मात्र, 29 सप्टेंबर रोजी पुन्हा दोन गाड्या अवतरल्याने भाविकांची लूट सुरू झाल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. नवरात्रोत्सवात होणारा हा प्रकार तातडीने थांबवून देविभक्तांना होणारा त्रास टाळावा, अशी मागणी नागरिक, वाहनचालक व भाविकांनी केली आहे.    

 
Top