धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यासह राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले,तर अनेक कुटुंबे बेघर होऊन विस्थापित झाली आहेत. या कठीण प्रसंगी तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पूरग्रस्तांसाठी आधारवड ठरत आहे.संस्थानच्या वतीने पूरग्रस्त महिलांना एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आले असून,जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून आवश्यक मदतकार्य सातत्याने सुरू आहे.
जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार स्वतः या कार्यावर लक्ष ठेवून आहेत. भाविकांच्या देणगीवर चालणारे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे नेहमीच समाजाप्रती बांधिलकी जपत आले आहे. कोल्हापूर व पुणे महापुरावेळी अन्नधान्य, पिण्याचे पाणी, साड्यांचे वाटप तसेच सन 2019 मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल 25 लाख रुपयांचे योगदान ही त्याचीच साक्ष आहे.
आज पुन्हा एकदा पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान पुढे सरसावले आहे. “देवीचे मंदिर केवळ उपासनेचे नव्हे,तर संकटात आधार देणारे स्थान आहे,“ हे या मदतकार्यातून अधोरेखित झाले आहे.
भाविकांशी असलेले भावनिक नाते जपत आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत,तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आजही आणि उद्याही संकटग्रस्तांच्या मदतीला तत्पर राहील.