धाराशिव  (प्रतिनिधी)-  मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. शेतातलं पीक वाहून गेली, जनावरांचे हाल झाले, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आणि असंख्य कुटुंबे बेघर झाले आहेत. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने 51 लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी देण्याची घोषणा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. 

मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा निर्णय घेतला असून, तात्काळ रक्कम शासनाकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्यावर्षीही अतिवृष्टीच्या काळात मंदिर संस्थानने 25 लाख रुपयांची मदत दिली होती. परंपरेप्रमाणे, संकटाच्या काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान समाजकार्याचे व्रत अखंडपणे पार पाडत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले,जनावरांचा चारा गेला,घरांची पडझड झाली.या सर्व परिस्थितीत ‌‘आई तुळजाभवानी 'च्या मंदिरातून आलेली 1 कोटी रुपयांची मदत ही फक्त आर्थिक नाही, तर पूरग्रस्तांना भावनिक आधाराची देणगी आहे. “आई तुळजाभवानी संकटात नेहमीच आपल्या लेकरांना धीर देत आली आहे.हे योगदानही त्याच मायेचा एक भाग आहे,“ असे सांगत संस्थानने पूरग्रस्तांसोबत एकात्मता व्यक्त केली.

 
Top