तुळजापूर (प्रतिनिधी) - मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण समारोह 17 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृति स्तंभास पालकमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
सदर कार्यक्रमात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते रोजगाराभिमुख प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये पर्यावरण पूरक हरित ऊर्जा निर्मिती करिता कार्यान्वित असणाऱ्या सेरेंटिका रिन्यूएबल्स एनर्जी यांच्या वतीने वाशी तालुक्यातील 25 युवकांना बेसिक इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम शिकविण्यात आला. या अभ्यासक्रमासाठी लागणारे सर्व शुल्क सेरेंटिका रिन्यूएबल्स यांच्या वतीने अदा करण्यात आले होते. यशस्वी प्रशिक्षणार्थींपैकी पाच विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापन दिनाच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रके बहाल करण्यात आली.
बेसिक इलेक्ट्रिशियन हा अभ्यासक्रम शिकविल्यामुळे आम्हाला रोजगार मिळणार आहे अशी सकारात्मक व समाधानकारक प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच हा अभ्यासक्रम त्यांना विनामूल्य शिकविल्याबद्दल त्यांनी सेरेंटिका रिन्यूएबल्स एनर्जी यांचे आभार मानले. सेरेंटिका रिन्यूएबल्स यांच्या माध्यमातून 5 गिगा वॅट हरित ऊर्जा निर्मिती करण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवण्यात आले आहे. पारंपारिक ऊर्जा प्राप्त करण्यामध्ये येत असणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने हरित ऊर्जा निर्मिती ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरण पूरक असणारी ही ऊर्जा पारंपारिक ऊर्जेच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे उपभोक्त्याच्या खिशावरचा भार देखील हलका होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील तरुणांना रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी ही कंपनी देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.