धाराशिव (प्रतिनिधी)- माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नद्या, नाल्यांना मोठया प्रमाणात पुर आला आहे. यामुळे जनजिवन वि स्कळीत झाले असून पुराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरल्यामुळे नागरीकांच्या घराची पडझड झाली आहे. याच बरोबर काही ठिकाणी पशुधनाची मोठया प्रमाणात जिवीत हानी होवून शेतकऱ्यांच्या व शेत मजुरांच्या उपजिवीकेचे साधन पुराने हिरावून घेतले आहे. या पार्श्वभुमीवर धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे शेतकऱ्यांना भरीव आर्थीक मदत करणेबाबत निवेदन दिले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील उमरगा लोहाराचे आमदार प्रविण स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदन देवून मायबाप सरकारने शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणेकरीता संपुर्ण कर्जमाफी देणेबाबत विनंती केली.          

तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रधानमंत्री पिक विमा योजना या हंगामापासून उंबरठा उत्पन्नाच्या आधारे शेतकऱ्यांना पिक विमा देण्याची अट ठेवली आहे व यापुर्वी याच योजनेत  1.पेरणी न होण्याची परीस्थिती, प्रतीकुल हवामान, स्थानिक अपदा, पिक कापणी पश्चात आपदा या तरतुदी यावर्षीपासून बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमाच मिळणार नाही त्यामुळे सदरचे बदलेले निकष रद्द करुन या अटी या योजनेसाठी कायम ठेवाव्यात.मिरज व कोल्हापुर येथे अतिवृष्टी झाल्यानंतर जशा स्वरुपाची मदत महाराष्ट्र  सरकार मार्फत करण्यात आली होती तशीच मदत यावेळी आमच्या भागात करावी.   अतिवृष्टी व पुरामुळे रस्ते, पुल, बंधारे, तलाव व विज वितरण कंपनीचे रोहीत्र  व विजेचे खांब वाहून गेलेले आहे तरी याची दुरुस्ती करणेबाबत विशेष दुरुस्ती कार्यक्रम राबवून दुरुस्ती करावी. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे यामध्ये बहूभुधारक  शेतकऱ्यांचा देखील समावेश करावा. ज्या शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे पशुधन पुरामध्ये वाहून गेले आहेत. अशा शेतकऱ्यांना त्या पशुधनाची भरपाई म्हणुन बाजार मुल्याप्रमाणे रक्कम द्यावी. अतिवृष्टीमुळे ज्या नागरीकांच्या घराची व शेतकऱ्यांची व मजुराची जनावरांचे गोठयांची पडझड झाली आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.  पंजाब सरकारने अतिवृष्टीमुळे हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. अशीच मदत महाराष्ट्र सरकारने आमच्या भागातील शेतकऱ्यासाठी जाहीर करावी.  वरील सर्व मागण्या तात्काळ मंजुर करुन शेतकऱ्यांना मदत करणेबाबत निवेदन देवून धाराशिव लोकसभा मतदार संघातील पुर स्थितीची दाहकता निदर्शनास आणून दिली.

 
Top