धाराशिव (प्रतिनिधी)- गणेश मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुका या लवकर काढून दिलेल्या वेळेपूर्वी मिरवणुका संपवाव्यात. कारण लहान मुले व महिला यांना या विसर्जन मिरवणुकामध्ये भाग घेता येतो म्हणून विसर्जन मिरवणुका दिवसा काढण्यास प्राधान्य द्यावे. असे आवाहन पोलिस अधिक्षक शफकत आमना यांनी केले आहे. 

जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन व ईद ए मिलाद जुलूस मिरवणूका या एकाच तारखेला आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद जुलूस 8 सप्टेंबर 2025 रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सण व मिरवणुका शांततेत व सौर्हादपूर्ण वातावरणात पार पाडाव्यात यासाठी जिल्ह्यातील गुंड, उपद्रवी व्यक्ती, समाजकंटक व गुन्हेगार वृत्तीच्या लोकांविरोधात विविध कायद्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. 


असा आहे बंदोबस्त

श्री गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात 123 पोलिस अधिकारी, 1566 महिला व पुरूष अंमलदार, 2 दंगल नियंत्रण पथके, जलद प्रतिसादचे 3 पथके यासह अतिरिक्त मनुष्यबळ एसआरपीएफचे 1 प्लाटून तसेच 770 पुरूष व महिला गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी, अंमलदार यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही पोलिस अधीक्षक यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी कोणत्याही अफवावर किंवा सोशल मिडियावर प्रसारीत होणाऱ्या संदेशावर विश्वास न ठेवता मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. 


धाराशिव शहर सज्ज

शहरातील गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. शहरातील घरगुती गणेश मुर्ती विसर्जनासाठी पालिकेने सहा विशेष रथाचे नियोजन केले आहे. हे रथ प्रभागनिहाय घरोघरी फिरून मुर्तीचे संकल्न करणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्ती विसर्जनासाठी हातलाई तलाव व विसर्जन विहिरीची स्वच्छता करण्यात आली आहे. 

शहरात लहान मोठ्या गणेश मंडळांनी 100 पेक्षा अधिक मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच घरोघरी गणरायांची स्थापना करण्यात आली आहे. बार्शी रोडवरील हातलाई तलावात श्रींच्या विसर्जन होणार आहे. शहरातील समता नगरातील विसर्जन विहिरीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुर्ती विसर्जिंत केल्या जाणार आहेत. दोन्ही ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी गर्दी होवू शकते. या पार्श्वभुमीवर पालिकेकडून तयारी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक रस्त्यावरील खड्डे सिमेंट कॉक्रिटने भरण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शहरातील इतर रस्त्यावरील खड्डे मात्र जैसे थे च आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणूक रस्त्यावर येताना रस्त्यावरील खड्डे चुकवत यावे लागणार आहे. 

 
Top