तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूरातील श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांना अनंत चतुर्थीच्या पूर्वसंध्येला (शुक्रवार, दि.5 सप्टेंबर) उत्साहात सुरुवात झाली असून, गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्थी दिनी शनिवार (दि.6) रोजी होणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार परिसरातून रणसम्राट गणेशोत्सव मंडळाच्या भव्य मूर्तीची आरती करून मिरवणुकीचा शुभारंभ झाला. या मिरवणुकांमध्ये “पाखरा पाखरा आजाद केले तुला” या गाण्यावर गणेशभक्तांनी बेधुंद नृत्य सादर केले. शहरभर या गाण्याचीच धूम दिसून आली. चिमुकल्या मुला-मुलींच्या नृत्याविष्कारांनी व लेझीम खेळाने, शहरवासीयांचे मन जिंकले, तर रस्त्यावर विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली.या मिरवणूकीत गुलालाची उधळण न करता रंगीबेरंगी कागदांचा तुकड्याची उधळण करण्यात आली.
तिर्थक्षेञ तुळजापूरात पाचव्या दिवसापासून सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सुरू होतात. अनेक मंडळांनी यापूर्वीच गणरायाचे विसर्जन मिरवणुका काढल्या असुन गणेश विसर्जन माञ अनंत चतुर्थी दिनी केले जाते. तर , अनंत चतुर्थीला मोठ्या मंडळांच्या भव्य मिरवणुकांतून गणरायाचे विसर्जन पार पडणार आहे.
यासाठी तडवळा तलाव शेजारील दगडी खाण तसेच पाचुंदा तलाव येथे विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.