धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या जय जवान अभियान, शक्ती अभियान तसेच व युवक काँग्रेस मार्फत नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

या पाहणी दरम्यान असे प्रकर्षाने जाणवले की, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आजही अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलेले असून शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पादन धोक्यात आले आहे. सरकारने जाहीर केलेली शासकीय मदत अत्यंत अपुरी आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर असून आत्महत्यांचा संभाव्य धोका नाकारता येत नाही.

वरील परिस्थिती लक्षात घेता पुढील महत्वाच्या मागण्या शासनाकडे करण्यात येत आहेत.

100% सरसकट पिकविमा वाटप तातडीने करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. आणेवारी काढताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्लॉटला प्राधान्य देण्यात यावे. सोयाबीन पिकाला एकरी 18-22 हजार रुपये येणारा खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 50,000 /- (पन्नास हजार) रुपये ही रक्कम 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई म्हणून तातडीने देण्यात यावी. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी बी-बियाणे आणि खतांचे मोफत वितरण करण्यात यावे. पिकविमा योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेत व विनाअडथळा मिळेल याची खात्री करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात. ज्या शेतकऱ्यांचे जनावरे पुरामध्ये वाहून गेले किंवा दगावले आहेत त्यांच्यासाठी 2019 चा कोल्हापुर जीआर चा निकष लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. 

वरील मागण्यासाठी आज धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष घालून शासनाला आवश्यक त्या सूचना कराव्यात व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्वरीत कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, जयदीप शिंदे, करण शिंदे, जाधव सुशांत, अक्षय उगमोगले, चैतन्य सुपेकर, नौमान शेख सहभागी झाले होते.

 
Top