धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.शेतजमिनीतील पिकांचे प्रचंड नुकसान,घरांची पडझड आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार जिल्हा अग्रणी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकामार्फत सर्व बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, सद्यःस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी.तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर असलेला होल्ड तातडीने हटवून शासनाकडून मिळणारे अनुदान व मदत रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

अलीकडे काही शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस मिळाल्या होत्या.याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,या नोटीस नव्या नसून लोकअदालत,पीक कर्ज नव्याने करणे किंवा तडजोडीच्या संदर्भातील जुन्या नोटीस आहेत.मात्र मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कुठल्याही नवीन नोटीसा देऊ नयेत,अशा कडक सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाकडुन सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम बाळगू नये,असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून,कर्ज वसुलीची भीती बाजूला ठेवून आता कुटुंब आणि शेती पुन्हा उभे करण्यासाठी काम करता येईल,अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 
Top