धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा परिसरात दिवसा ढवळ्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकवर चढून माल चोरी करणाऱ्या टोळीचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. एक प्रकारचे पोलिसाला हे आव्हानच दिले होते. हे आव्हान स्वीकारत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने काही तासातच या गुन्हेगारांना दि. 9 सप्टेंबर रोजी रात्री जेरबंद केले आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, चलत्या ट्रकमधील चोरी करणाऱ्या आरोपींच्या टोळीतील काही आरोपी येडेश्वरी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गाडी अडवून त्यांना लुटण्याच्या तयारीत आहेत. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मलकापूर गावाजवळ येडेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रवाना झाले. याच रस्त्यावर स्कॉर्पिओ गाडीत संशयास्पद हालचाल दिसून आल्याने पोलिसांनी आरोपी गाडी घेरली. त्यावेळी दोन आरोपी पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. तर इतरांना गाडीतच जेरबंद करण्यात आले.
पोलिसांनी अमोल नाना काळे (28), किरण बापू पवार (25), दत्ता दादा काळे (21), गणेश नाना काळे (32), सुभाष तानाजी काळे (24) आणि शिवा रमा पवार (22) सर्व राहणार तेरखेडा या आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल व महिंद्रा स्कॉर्पिओ असा मिळून 11 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
50 लाखाच्या दरोड्यातील आरोपी
सदरील आरोपी बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या टोळीतील तिघे आरोपी पुणे शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या 50 लाख रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्यातही फरार आहेत. या संदर्भात अधिक चौकशी चालू असून, सविस्तर माहिती दोन दिवसात मिळेल अशी माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी पु. वि. लोकराज्यला, दिली आहे.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शफकात आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोह विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चापोह महबूब अरब, तसेच विनायक दहीहंडी व प्रकाश बोइनवाड यांच्या पथकाने केली.
