भूम (प्रतिनिधी)- भूम पंचायत समितीच्या दोन रोजगार हमी योजना कंत्राटी कर्मचाऱ्यांची गाडी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. घटना तालुक्यातील ईट जातेगाव रोड येथे मंगळवारी दि. 9 सप्टेंबर रोजी दुपारी 5 ते 5:15 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यात एकाला खूप गंभीर जखमी झाली असून बीड येथे उपचारासाठी दाखल केले असून दुसरा प्राथमिक उपचार करून घरी पाठवले आहे. या घटनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भूम पंचायत समिती कार्यालयाचे कंत्राटी कर्मचारी रवींद्र राख (इंजिनीयर) व कृष्णा बांगर (कॉम्प्युटर ऑपरेटर) दोघे एकत्र मिळून विहिरींची, गाय गोठा, शेत रस्ते, अशा कामांची तपासणी करत होते. तसेच मंगळवारी शेतकऱ्यांच्या विहिरींची तपासणी करून आपल्या चारचाकी वाहनातून बीड जिल्ह्यातील पाटोदाकडे जात होते.
दोन्ही कर्मचारी ईट-जातेगाव रोडवरील किनारा हॉटेल जवळ पोहोचले असता ईटकडून दुचाकीवर आलेल्या दोघांनी पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या गाडीला दुचाकी आडवी लावली. तुमच्याकडे काम आहे असे म्हणत त्यांना थांबवले. कर्मचाऱ्यांनी गाडीचा दरवाजा उघडताच अज्ञात व्यक्तीने खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. त्याच ठिकाणी ईटकडून एक दुचाकी आली. त्याच्यावरही दोघेजण होते. त्यांच्या हातात कुन्हाड व तलवार होती. यातील एकाने राख यांच्या तोंडावर तलवारीने हल्ला केला. यावेळी त्यांनी बांगर यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत जखमी केले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. पुढील तपास वाशी पोलीस करत आहे.

