धाराशिव (प्रतिनिधी)- नुकसान अभूतपूर्व आहे. पिक कापणी प्रयोगानंतरही उत्पन्न अत्यल्प असल्याचेच स्पष्ट होणार आहे. प्रशासनाला तशा आवर्जून सूचनाही देण्यात आल्या आहेत. पिकविम्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत नुकसान भरपाई मिळणार आहेच. मात्र त्यासाठी पीककापणी प्रयोगाबाबत आपण अधिक सतर्क राहायला हवे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
पीकविमा आणि नुकसान भरपाई बाबत काही गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर होण्यासाठी पिक कापणी प्रयोगाबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. एका मंडळात एका पिकाचे एकूण बारा पिक कापणी प्रयोग होणार आहेत.सध्या जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती पाहता पीक कापणी प्रयोग व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काढलेले उत्पादन हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असणारा आहे.त्यामुळे निकषानुसार याची उंबरठा उत्पन्नासोबत तुलना केल्यावर मोठया प्रमाणात नुकसान झालेचे स्पष्ट होणार असल्याने मोठी नुकसान भरपाई मिळणार आहे.सदर नुकसान भरपाई मिळताना मंडळातील सर्व शेतकरी बांधवांना एकसारखी मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.