धाराशिव, (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आयोजित शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवामध्ये गुरुवारी फोक लोक स्टुडिओच्या कलाकारांनी लोकसंगीत आणि लोकनाट्य यांचा सुंदर मिलाफ घडवून रसिकांना एक अनोखा अनुभव दिला.महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेतील जुन्या पारंपरिक रचना तसेच नवीन स्वरचित कलाकृतींमधून त्यांनी अर्थपूर्ण आणि नाट्यमय सादरीकरण सादर केले.परंपरा ही फक्त मागे वळून पाहण्याची नव्हे तर नवीन पिढीच्या नजरेतून अनुभवण्याची गोष्ट आहे,याची प्रचिती देणारा हा कार्यक्रम ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवामध्ये दररोज एका महिलेला सन्मानित करण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी प्रियंका रघुवीर पासले यांना श्री तुळजाभवानी देवींजींची प्रतिमा, कवड्याची माळ,महावस्त्र आणि 11 हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

विविध उपजीविका उपक्रम राबवून स्थानिक महिलांना रोजगार व स्वावलंबी करण्यासाठी त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.याची दखल घेत मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व सौ.सौमय्याश्री पुजार यांनी त्यांचा यथोचित गौरव केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,सहायक जिल्हाधिकारी तथा भूमचे उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने,नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.


तुळजाभवानी देवींच्या गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन

तुळजाभवानी देवीला अर्पण करण्यात आलेल्या तीन गीतांच्या एका विशेष अल्बमचे प्रकाशन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यातील ‌‘तुळजाभवानी' हे शीर्षक गीत सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायले आहे.तर ‌‘तुळजाभवानी मंत्र  सर्व मंगल मांगल्ये' हे गायिका संचारी सेनगुप्ता यांनी गायले आहे. तसेच, ‌‘तुळजाभवानी मंत्र,गोंधळ, स्तुती' हे गीत आदर्श शिंदे,संचारी सेनगुप्ता आणि गौरव चाटी यांनी गायले आहे. या तिन्ही गाण्यांना संगीतकार गौरव चाटी यांनी संगीतबद्ध केले असून गीतकार विक्रांत हिरनाईक यांनी शब्दबद्ध केले आहे.

 
Top