धाराशिव (प्रतिनिधी)-अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागांतील शाळांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शाळेच्या इमारती पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अशा शाळांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे आहवाल सादर करावेत, असे निर्देश मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सततच्या मुसळधार पावसामुळे शेती, पिके घरांचेही नुकसान झाले आहे. महाळंगी (ता. धाराशिव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती लागल्याचे शुक्रवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निदर्शनास आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी तेथूनच मोबाईलवरून संपर्क साधून त्यांनी शाळेची दुरुस्ती करून घेण्याची सूचना केली.
अस्मानी संकटामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतीच्या नुकसानीसह ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अनेक गावांतील शाळांनाही त्याचा फटका बसला आहे. इमारतींना तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी गळती लागली आहे. निरागस चिमुकल्या मुलांना धोकादायक परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाळंगी गावातील शाळेला आवर्जून भेट दिली. चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व शाळांची सध्या काय अवस्था आहे, याचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश मोबाईलवर संपर्क साधून दिले. नंतर त्यांनी पत्रही दिले. शेत-शिवाराची काळजी घेत असतानाच या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपलीच आहे, या भावनेतून आमदार पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीबाबत चर्चा केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, शाळांची दुरुस्ती, पुनर्बांधणीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही आमदार पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. महाळंगी येथे शाळेची पाहणी करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, बाजार समितीचे चेअरमन राजाभाऊ पाटील, माजी चेअरमन व्यंकट पाटील यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.