धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी रुपये 50 हजाराची मदत करावी. तसेच शेतकयांची सर्व कर्जमाफी करण्यात यावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली येडशी (ता. धाराशिव) चौरस्त्यावर शुक्रवार दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात मंत्र्याच्या गाड्या आडविण्यात येतील, असा इशारा श्री. दुधगावकर यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, माहे 1 जून 2025 ते 24 सप्टेंबर 2025 या कालावधीत धाराशिव जिल्ह्यामध्ये सरारीने 42 मंडळामध्ये 1000 ते 1100 मी.मी.पाऊस पडला. त्यापूर्वी 14 मे 2025 ते 31 मे 2025 या कालावधीत 173 मी.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यामध्ये खरीप 2025 ला 5 लाख 72 हजार इतक्या शेतीवर सोयाबीन, मुग, उडीद, मका, फळबागा, ऊस उत्पादक आदीची लागवड झाली. परंतू ही पीके 100 टक्के अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झाली. जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये शासनाने सरसकट पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करुन 50 हजाराची तातडीने मदत करावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. शेतीमालाला, भाजीपाला व फळांना हमीभाव कायदा करुन भावांतर योजना लागू करावी. दुधाला हमीभाव कायदा लागु करुन गाईच्या दुधाला 40 रुपये व म्हशीच्या दुधाला 70 रुपये भाव देण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली व गाळ साठला आहे, अशा बहुभुधारक शेतकऱ्यांना देखील शासकीय योजनेमध्ये सामावेश करावा. अतिवृष्टी व पुरामुळे घरांची, शेतकऱ्यांची, मजुरांची व जनावराचे गोठे उद्धवस्त झालेले आहेत, त्यांना आर्थीक मदत द्यावी.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, भारत शिंदे, बालाजी डोंगे, नामदेव चव्हाण, इकबाल पटेल, किशोर आवाड, गौतम क्षिरसागर, बबन काळदाते, प्रदिप काळदाते, ॲड. प्रविण शिंदे, ॲड. प्रमोद शिंदे, आप्पासाहेब आवाड, किशोर आवाड, बाळासाहेब निगुट, गणपत भोसले, बाळासाहेब कथले, विठ्ठल माने, औदुंबर धोंगडे, मनोहर हरकर, लिंबराज लोकरे, शिवाजी ढोले, गुंडाप्पा गाजरे, संभाजी गायकवाड, हनुमंत गरड, भास्कर शिंदे, पांडूरंग भराटे, महमंद शेख, भगवान बायस, आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.