कळंब (प्रतिनिधी)- जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ते मराठा समाज आणि मराठा समाजातील महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ही क्लिप समोर येताच मराठा समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिले होते.
बकालेवर कठोर कारवाई करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे यांनी जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयावर महामोर्चा देखील काढण्यात आला होता. तसेच साखळी उपोषण करून देखील बकाले याच्यावर गुन्हा दाखल होत नव्हता त्यानंतर शिंदे यांनी दिल्लीत देखील आंदोलन केले होते. बकाले याला अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कळंब तालुक्यातील तांदुळवाडीचे रहिवासी पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव सिंदखेडराजा यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, शिव प्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर,संभाजीनगरचे छावा संघटनेचे किशोर चव्हाण,बल्लाळेश्वर युवा संघटनेचे हरिभाऊ पाटील,रयत सेनेचे गणेश पवार,गवळी समाज संघटनेचे प्रमुख दिलीप गवळी यांच्यासह राज्यभरातील सामाजिक संघटना तसेच समाज बांधवांनी पाठपुरावा केला होता.
सप्टेंबर 2022 मध्ये ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती दरम्यान,आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपच्या सतत्येची पडताळणी करत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी विभागीय चौकशी करत चौकशीत बकाले यांना दोषी ठरवून त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. पोलिस महासंचालकांच्या समोर आपले म्हणणे मांडण्याची संधी देखील बकाले यांना देण्यात आली होती. मात्र त्याने नवीन कोणताही मुद्दा मांडला नाही तसेच त्याच्यावरील आरोपांचा प्रतिवाद देखील करता आला नाही. अखेर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बकाले याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश काढले.