भूम (प्रतिनिधी)- इस्लामचे प्रचारक आणि प्रसारक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त भूम शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने आज भूम शहरात शांतता फेरी (जुलूस) मोठ्या उत्साहात पार पडली. दिनांक 5 सप्टेंबर रोजी जयंती असली तरी त्या दिवशी हिंदू धर्मीयांचा गणेशोत्सव सुरू असल्याने प्रशासनाच्या विनंतीला मान देत मुस्लिम समाजाने जयंतीचा कार्यक्रम दिनांक 9 सप्टेंबर रोजी आयोजित केला.
शांतता फेरीची सुरुवात शहरातील प्रसिद्ध हजरत मेहनती शाहवली दर्ग्यापासून झाली. त्यानंतर कसबा पेठ आणि संपूर्ण भूम शहरातून फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाला भूम शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विविध ठिकाणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी फेरीचे उत्साहाने स्वागत केले.
फेरीदरम्यान लहान मुलांसाठी खाऊचे वाटप करण्यात आले. कसबा पेठ येथे चाऊस बॉईज, जुनी कचेरी व गौसीया मस्जिद येथे शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अनिल शेंडगे, कोर्टासमोरील भागात स्वराज क्रीडा मंडळ यांच्याकडून पाणी, खाऊ आणि सुगंधित दूध वाटप करण्यात आले.
ही शांतता फेरी यशस्वी करण्यासाठी ऍड. सिराज मोगल, इस्माईल मोगल, कलीम मोगल, फेरोज शेख, आफताब शेख, गौस शेख, अलीम शेख, सोहेल मोगल, समीर शेख, इमरान मोगल, तनवीर मोगल, सलीम नाईकवाडी, आयाज मुलानी, जफर पठाण, असलम बागवान, हजरत टिपू सुलतान सामाजिक युवा मंच आणि गाझी प्रतिष्ठान कसबा भूम यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजातील सौहार्द आणि एकोपा वाढवणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
