धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करीत आहेत. या लढ्यात प्रत्येक जन आपआपल्या परीने कर्तव्य करीत योगदान देत असून, जबाबदारी पार पाडत आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील हे मदतीसाठी मैदानात उतरले असून, तेरणाच्या माध्यमातून मदत करीत आहेत. नियोजनासाठी मराठा स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे.
नवी मुंबई येथील नेरूळच्या तेरणा विद्यालय आणि जुनिअर कॉलेज परिसरात मराठा बांधवांची राहण्याची, जेवणाची आणि वाहन पार्किगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र रोज वाढ असलेली संख्या, त्यात पावसाचे दिवस असल्याने आता एकाच वेळी पाच ते सहा हजार समाज बांधवांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी वेगात काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या मैदानात वॉटरप्रुफ डोंब उभारला जात आहे. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या हजारो मराठा शिलेदारांच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था तेरणा परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या बांधवांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात तेरणा परिवाराने मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्विकारली आहे.