भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील विश्वरूपा व बाणगंगा नदी मधून मागील दोन दिवसापासून मध्यरात्री अवैद्यरित्या वाळू उपसा चालू असून, हा वाळू उपसा बंद करण्यात यावा. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. हा वाळू उपसा महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या कृपाशीर्वादाने होत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
मागील दोन दिवसापासून तालुक्यातील माणकेश्वर येथील विश्वरूपा नदी मधून मध्यरात्री काही वाळू माफिया अवैधरित्या वाळू उपसा करत असताना दिसून आले. तर बेलगाव पिंपळगाव मधील बाणगंगा नदी मधील बंधाऱ्याच्या ठिकाणाहून जेसीपी व ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळू उपसा चालू असल्याचे बेलगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना अडवले असता ग्रामस्थांना वाळू माफियांनी उलट सुलट उत्तरे दिली व तेथून पलायन केले. मागील दोन महिन्यांमध्ये ढगे चिंचपूर येथे अशाच प्रकारे शेतकऱ्यांना मारहाण करून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात आला होता. त्यावेळी मध्यरात्री पोलीस प्रशासन घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणाहून एक पिवळा टिपर सोडून देण्यात आला होता. मात्र अद्यापही तो टिप्पर पोलीस प्रशासनाने किंवा महसूल प्रशासनाने जप्त केलेला नाही. बाणगंगा व विश्वरूपा नदी मधून अवैधरित्या मध्यरात्रीच्या सुमारास कायम वाळू उपसा केला जातो. त्या ठिकाणातील ग्रामस्थ तलाठी किंवा मंडळाधिकारी यांना फोन लावतात. मात्र ते ग्रामस्थांचा फोन उचलत नाहीत. त्यामुळे महसूल प्रशासनाचे वाळू माफिया सोबत लागेबंधे आहेत का ? असा प्रश्न ग्रामस्थ बोलवून दाखवत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी माणकेश्वर व बेलगाव पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
तहसीलदार यांना आदेश देवून पथक नेमून तालुक्यातील अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डोंगरे
उपविभागीय अधिकारी भूम.
वारंवार महसूल प्रशासनाला अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपसा संदर्भात तोंडी सूचना दिल्या तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नाही. मात्र यामुळे शेतकऱ्यांना त्रास निर्माण होत आहे. त्यामुळे अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
गणेश अंधारे
शेतकरी.