धाराशिव, (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी स्वतंत्रपणे फोटो देण्याची सक्ती नसल्याचे जिल्हाधिकारी किती किरण पुजार यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सलग दोन ते तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काही भागात नद्या व नाल्यांना पूर आला असून,शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत.या सर्व घटनेचा पंचनामा करण्याचे काम महसूल प्रशासन व शेती विभाग एकत्रितपणे करत आहेत. पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना फोटो आणण्याची आवश्यकता नाही. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही,यासाठी अधिकारी-कर्मचारी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सांगितले.
काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांकडून फोटोची मागणी होत असल्याचे लक्षात आल्याने याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांना फक्त नुकसानग्रस्त क्षेत्र दाखवायचे असून,पंचनाम्यासाठी पुरेसा पुरावा मिळवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.कोणत्याही प्रकारची फोटोसक्ती जिल्हा प्रशासनाने केलेली नाही. शेतकऱ्यांनी याबाबत गैरसमज बाळगू नये व पंचनाम्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.