तुळजापूर (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे धाराशीव जिल्ह्यात शेतजमीन, उभे पीक, घरे-दारे व जनावरे पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाकडून पंचनामे व मदतकार्य सुरू असले तरी नुकसानीचा प्रचंड अवाका लक्षात घेता शेतकऱ्यांना अतिरिक्त मदतीची तातडीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पवनचक्की व सौरऊर्जा विकासक कंपन्यांनी फंडातून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.
सुर्यवंशी यांनी पालकमंत्री तसेच जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,“धाराशीव जिल्ह्यात अनेक पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प सुरू आहेत. या कंपन्या स्थानिक संसाधनांचा वापर करून प्रचंड नफा कमावत आहेत. मात्र फंडाचा उपयोग गावकऱ्यांच्या खऱ्या विकासासाठी न होता केवळ दिखाऊ खर्च केला जातो. आज शेतकरी आपत्तीग्रस्त स्थितीत असताना, या कंपन्यांनी सीएसआर फंड थेट जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा,“ अशी मागणी करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती
यासोबतच पालकमंत्र्यांनी वैयक्तिक हस्तक्षेप करून फंडातून होणारी मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असेही सुर्यवंशी यांनी आवाहन केले आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.