तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे अनेक कुटुंबांना बेघर व्हावे लागले असून शेती, जनावरे तसेच घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पुढे सरसावले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने परांडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांसाठी एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते या साड्यांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे स्वतः परांडा तालुक्यातील पुरस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी पूरबाधित गावांची पाहणी करून विविध विभागांकडून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी वडनेर गावातील पूरग्रस्त 34 नागरिकांना प्रत्येकी 5 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच रुई येथील लोकांना अन्नधान्य किट देण्यात आले. वागेगव्हाण गावात झालेल्या नुकसानीचीही पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आल्याने पूरग्रस्त भागातील लोकांना दिलासा मिळाला आहे.