धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जात असताना कृषी विभागातील महत्वाची पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये अधिक भर पडली आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती धाराशिवचे संचालक उमेश राजेनिंबाळकर यांनी कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे यांना याबाबत निवेदन दिले आहे. जिल्हा कृषी अधिक्षक, जिल्हा परिषद कृषी अधिकारी व धाराशिव तालुका कृषी अधिकारी अशी तीन महत्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. परिणामी शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवताना आणि समस्यांचे निराकरण करताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी सतत नैसर्गिक संकटात सापडले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागात पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी व मागण्या प्रलंबित राहत असल्याचे राजेनिंबाळकर यांनी निदर्शनास आणले आहे.

तसेच, धाराशिवमध्ये हवामान केंद्र मंजूर असूनही मागील तीन वर्षांपासून ते कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक हवामानाचा अंदाज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या हितासाठी कृषी विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

 
Top