भूम (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवाच्या सातव्या माळी दिवशी म्हणजेच सप्तमी दिवशी नगरहून निघालेला मानाचा पलंगाचे दि. 29 सप्टेंबर रोजी भूम शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पलंग दाखल होताच पलंगाचे सेवेकरी महादेव चव्हाण, बापू कुंभार, महेश बागडे, सुधाकर झील ,गोवर्धन माळी आदी सेवेकरी डोक्यावर पलंग घेऊन कसबा विभागातून पेठ विभागातील गोंधळी यांच्या घरापासून ते तेली यांच्या खुटावर विसावा घेतात. त्यानंतर शहरातून पलंगाचे तुळजापूरच्या दिशेने प्रस्थान होते.

साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्वाचे स्थान आहे. नवरात्र उत्सव काळात पालखी मधून सीमोल्लंघन केले जाते. कुलस्वामिनीच्या मंदिरातील प्रथा परंपरा शेकडे वर्षांपासून आजही भक्तिभावाने अखंडपणे जोपासली जात आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी लागणारी पालखी व पलंग पुरवण्याचा मान अहिल्यानगर शहराला आहे.

तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला लागणारा पलंग आणि पालखी घेऊन येण्याचा मान नगर तालुक्यातील बुन्हाणनगर गावाला आहे. येथील रहिवासी भगत यांना पालखीचा तर नालेगावातील पलंगे यांना पलंगाचा मान मिळालेला आहे. घटस्थापनेच्या दिवशी पलंग नगरमधील तुळजाभवानी मंदिरात दाखल होतो. दोन दिवस मुक्काम केल्यानंतर तिसऱ्या माळेला पलंग नगरजवळील भिंगार येथील हनुमान मंदिराकडे प्रस्थान करतो. याचवेळी राहुरी येथे तयार झालेली देवीची पालखी भिंगारमध्ये दाखल होते. अतिशय नयनरम्य सोहळ्यात तेथे पलंग आणि पालखीच्या भेटीचा सोहळा संपन्न होतो.


या गावांचे मानकरी असतात सोबत

पुढे तुळजापूरला पलंग घेऊन जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील खुटेफळ, चिंचोडी पाटील, सय्यदपौर आणि कुंडी या चार गावचे लोक मानकरी म्हणून सोबत असतात. अशा रितीने नगर, भिंगार, जामखेड, बीड जिल्ह्यातील आष्टी, भूम, चिलवडी, आपसिंगामागें दसऱ्याच्या आदल्यादिवशी तुळजापुरात पलंग दाखल होतो . शहराच्या पेठ विभागातील शिवाजीनगर परिसरात जयेंद्र मैदरगे यांच्या निवासस्थानी पलंगाची आरती करून पलंग श्री शेत्र तुळजापूर कडे मार्गस्थ झाला यावेळी समर्थ नगर शिवाजीनगर परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top