तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी देवीजी मंदिरामध्ये सध्या शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. लाखो भाविक या निमित्ताने नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात येत असतात. त्यापुढील कोजागिरी पौर्णिमेपर्यंत लाखो भाविकांचा ओघ सुरू असतो. या दरम्यान भाविकांना वैद्यकीय मदत लागल्यास मंदिर परिसरामध्ये अनेक ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. सेरेंटिका रिन्यूएबल्स यांच्या वतीने या प्राथमिक उपचार केंद्रावरती लागणारी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भाविकांना या औषधांचे वाटप विनामूल्य करण्यात येत आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर येथील मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्यावतीने अनेक सोयी सुविधा पुरविल्या जातात. दर्शन रांगेचे व्यवस्थापन, वाहनांचे पार्किंग, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांचे नियोजन, पिण्याचे पाणी, शौचालये आणि वैद्यकीय सहकार्य यामुळे लाखो भाविक श्री भवानी मातेच्या दर्शनाची अनुभूती घेतात. मंदिर संस्थानाच्या वतीने अनेक ठिकाणी वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित केली आहेत. यापैकी नऊ प्रथमोपचार केंद्रांवर सेरेंटिका रिन्यूएबल्स यांच्या वतीने विनामूल्य वाटपासाठी औषधे उपलब्ध करण्यास पाठबळ पुरवण्यात आले आहे.
तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी सेरेंटिका रिन्यूएबल्स चे असिस्टंट वाईस प्रेसिडेंट सुरजीत नारायण यांच्याकडे पत्राद्वारे सीएसआर फंडातून औषधांसाठी पतपुरवठा करण्याची विनंती केली होती.हे आस्थापन धाराशिव जिल्ह्यामध्ये 5 बिलियन युनिट्स पर्यावरण पूरक हरित ऊर्जा निर्मिती चे कार्य करीत आहे. र्श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वतीने आलेल्या प्रस्तावास सेरेंटिका यांनी त्वरित मंजुरी दिल्यामुळे लाखो भाविकांना औषधांचा पुरवठा करणं शक्य होत आहे. श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या वतने करण्यात येत आहे.