कळंब (प्रतिनिधी)- शालेय जीवनात विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आणि पोषक वातावरण मिळाल्यास ते अधिक समृद्ध बनतात. यासाठी समाजातील जाणकार व्यक्तींनी पुढे येऊन शाळांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुशील आडसूळ यांनी केले.

कळंब तालुक्यातील डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेत, स्व. रामलिंग सिताराम सदाफुले (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सदाफुले गुरुजींचे सुपुत्र विशाल सदाफुले यांनी वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी शाळेला डिजिटल तक्ते भेट दिले.

डॉ. आडसूळ पुढे म्हणाले, “स्वर्गीय सदाफुले सरांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थी घडविण्यात समर्पित केले. आज त्यांचा मुलगा विशाल हेच पवित्र कार्य पुढे नेत आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. शिक्षणाने माणसाचा कायापालट होतो, त्याचप्रमाणे ज्ञानदान करणाऱ्या शाळांचा कायापालट झाला तर शिक्षणाला एक नवा आयाम मिळेल. आपल्या पूर्वजांच्या स्मृती खऱ्या अर्थाने जागृत ठेवायच्या असतील, तर अशा समाजोपयोगी कामांची आज नितांत गरज आहे.“ या कार्यक्रमावेळी कळंब मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रमोद पोते, डॉ. सुशील आडसूळ, विशाल सदाफुले, मुख्याध्यापक निकम पोपट, सहशिक्षक प्रदीप यादव, किशोर वाघमारे, सज्जन बर्डे, रमेश अंबिरकर, नामदेव झाडे, सूरज राऊत यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



चौदा वर्षांपासून अविरत ज्ञानयज्ञ

विशाल सदाफुले हे गेल्या चौदा वर्षांपासून आपल्या वडिलांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी परिसरातील शाळांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट देत आहेत. वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


डिजिटल तक्त्यांमुळे ज्ञानात भर

शाळेला भेट देण्यात आलेल्या या डिजिटल तक्त्यांवर भूमितीय आकृत्या, मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे नियम, थोर भारतीय शास्त्रज्ञांची माहिती, तसेच विविध प्रकारचे नकाशे यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार आहे.


 
Top