भूम ( प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील सुकटा शिवारात पवनचक्की कंपनीकडून अवैध (मुरुम) उत्खनन चालू असताना माजी सरपंच बजरंग गोयेकर हे त्या ठिकाणी गेले असता त्यांना फोटो का काढले म्हणत पवनचक्की माफीयांनी सांभाळलेल्या गावगुंडांकडून बेदम मारहाण केली आहे. त्यांच्यावर बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील सुकटा शिवारात पवनचक्की कंपनीचे कामे चालू आहेत. अवैध (मुरूम) उत्खनन चालू असताना माजी सरपंच गोयकर त्या ठिकाणी गेले असता त्यांना पवनचक्की कर्मचाऱ्यांनी फोटो का काढले असे विचारत मारहाण केली. व नंतर पाच गावगुंडांना बोलावून घेत दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 : 30 वाजण्याच्या सुमारास भूम कडे येत असताना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. गोईकर यांना बार्शी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. भूम पोलीस निरीक्षक, बीट आमलदार यांनी बार्शी येथे गोयेकर यांची भेट घेतली आहे. परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बजरंग गोयेकर हे सातत्याने पवनचक्की कंपनी व पवनचक्की माफिया विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत.
