तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील रहिवासी सिद्धेश शाम शिंदे याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे.
त्याने एनसीसी विशेष प्रवेश योजनेद्वारे त्यांनी प्रतिष्ठित सेवा निवड मंडळ (एसएसबी) मुलाखत उत्तीर्ण केली आणि चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए) मध्ये प्रवेश मिळवला. 12 महिन्यांच्या कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षणादरम्यान लेफ्टनंट शिंदे यांनी अविश्रांत परिश्रम घेतले आणि अत्यंत कष्टसाध्य सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर त्यांची भारतीय सैन्याच्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्स या प्रतिष्ठित शाखेत आयोगित अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ही शाखा आपल्या जबाबदाऱ्यांच्या कठीणतेसाठी आणि लष्करी कारवाईतील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी ओळखली जाते. चेन्नई येथे झालेल्या दीक्षांत सोहळ्यामध्ये सिद्धेश याचा सन्मान करण्यात आला. यावेळी आजी विमल शिंदे, वडील शाम शिंदे, आई वैशाली शिंदे, चुलते मुकुंद शिंदे, सविता शिंदे, बहिण समृद्धी शिंदे उपस्थित होते. या यशाबद्दल सिद्धेशचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
