तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या विरोधात सध्या काही माध्यमांतून होत असलेली बदनामी ही पूर्णपणे निराधार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने स्पष्ट केले आहे. पक्षाच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात, “नाहक चालवली जाणारी ही बदनामी मोहीम तातडीने थांबवावी,” अशी ठाम मागणी करण्यात आली आहे

शहरवासियांच्या मागणीनुसार तब्बल तेरा वर्षांनी 2025 पासून जिल्हाधिकारी पुजार यांनी तुळजाभवानी नवरात्रोत्सवात सांस्कृतिक महोत्सव सुरू केला. दिवसभर ते पूरग्रस्त भागांची पाहणी करीत असून, रात्री अंतिम टप्प्यातील कार्यक्रमात उपस्थित राहून कलाकारांचा सत्कार करतात. कलाकारांच्या आग्रहास्तव ते स्टेजवर गेले  यात काहीही वावगे नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

“सध्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा वेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी परिस्थितीवर स्वतः जिल्हाभर फिरून आढावा घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत,” असे पत्रकात नमूद आहे.

 
Top