धाराशिव  ( प्रतिनीधी)-  हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे असा ठराव धाराशिव तालुक्यातील शिंगोली ग्रामपंचायतीच्या सभेत घेण्यात आला आहे. गावच्या सरपंच योगिता राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 17 सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत हा ठराव घेऊन प्रशासनाकडे पाठविण्यात आला.

गावातील बंजारा बांधवांनी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळणेबाबत सभेत सामूहिक निवेदन दिले होते. सभेत महिला बचत गटाच्या अध्यक्ष मनीषा सतीश राठोड यांनी महाराष्ट्र शासनाला मराठा समाजाला आरक्षण देतेवेळी 2 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करताना हैदराबाद गॅजेटचा आधार घेतला आहे. त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात असल्याचा उल्लेख असून त्याच्या आधार घेऊन शासनाने बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा यासाठी ग्रामपंचायतीने पाठिंबा देऊन तसा ठराव पारित करावा अशी मागणी केली. सभेत यावर चर्चा होऊन सरपंच श्रीमती योगिता राहुल शिंदे यांनी त्यास अनुमोदन दिले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

बंजारा समाजाच्या वतीने मनीषा सतीश राठोड, माया रामदास आडे, संगीता तानाजी राठोड, स्नेहल बालाजी राठोड, रंजना जीवन आडे, पूजा भारत पवार, पूजा सुनील राठोड, सविता बाबुराव राठोड, सारिका अरुण राठोड, मंगल माणिक राठोड व इतर महिलांनी ठराव घेण्याबाबत निवेदन दिले होते. ग्रामपंचायतने निवेदनाची दखल घेतल्याबद्दल समाजाने सरपंच व सदस्यांचे आभार व्यक्त केले आहेत. 


 
Top