नळदुर्ग (प्रतिनिधी)-सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे पंचनामा न करता तात्काळ सरसगट शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली. अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येइल असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
या वेळी बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की,धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. सध्या मूग आणि उडीद ही दोन्ही खरीप पिके वाया गेली आहेत. खरिपाच्या या दोन्ही पिकांनी कसलेच उत्पन्न शेतकऱ्यांना दिले नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्यातच आता सोयाबीन पिक ही पाण्यात वाहून गेले आहे. तर बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही पाण्यात उभे आहे, त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. म्हणून सत्तेत असणाऱ्या आमदार आणि खासदार यांनी शेतात पाण्यात जाऊन पाहणी करण्याचा देखावा करण्यापेक्षा तात्काळ शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत नुकसान भरपाईच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी ही त्यांनी केली. आता जर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याचे काम सरकारचे आहे, म्हणून अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करण्यापेक्षा सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, कारण आता पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही शेतात जाता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात शेतात पाणी उभे आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना ऊस पिकावर दिलासा मिळेल असे वाटत असताना ऊस पिकाचे ही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पावसामुळे ऊस पीक आडवे झाले आहे, परिणामी. ऊस तोडणी पर्यंत ऊसाला मोठ्या प्रमाणात फुटवे फुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऊसाचे ही उत्पन्न शेतकऱ्यांना दिलासा दायक ठरणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई शासनाने द्यावी अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी दिला आहे.