धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आयोजित शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात आज लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. रसिकपर्ण डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या या नृत्यप्रस्तुत्यांमध्ये कोळीगीत, वाघ्या-मुरळी, दिंडी व गोंधळ यांचा समावेश होता. ताल-लयबद्ध पावलं आणि पारंपरिक वेशभूषेच्या माध्यमातून कलाकारांनी लोकजीवनातील वातावरण प्रेक्षकांसमोर जिवंत केले.
कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर लोकनृत्यांचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी कृषी व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या रोहिणी धीरज सुरवसे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसारातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्याची माळ, महावस्त्र आणि अकरा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार बोळंगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सन्मानाने शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवाच्या सोहळ्याला सामाजिक अंग प्राप्त झाले. रोहिणी सुरवसे यांनी शेतकरी व ग्रामीण समाजात विविध शासकीय योजना पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाला तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. शारदीय नवरात्र महोत्सवातील हा लोकनृत्यांचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ठरला.