भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील देवळाली येथील युवक गणेश तांबे (वय 38) हा 23 सप्टेंबर रोजी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तो आज दि. 26 सप्टेंबर रोजी तब्बल 32 किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडला आहे.
तालुक्यात दिनाक 22 सप्टेंबर रोजी रात्रभर पाऊस झाला होता. यामुळे देवळाली भागात पूर आला होता. या पुराच्या पाण्यात गणेश तांबे हा युवक सायंकाळी देवळाली गावातून घरी जात असताना वाहून गेला होता. घटनेनंतर एनडीआरएफ टीमने तत्काळ दोन किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. यामुळे ग्रामस्थ व नातेवाईक यांची चिंता वाढली होती.
आज सकाळी असू गावातील शेतकरी समाधान मासाळ हे विहिरीजवळील शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना नदीकाठी एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ गावात माहिती दिली. याची चर्चा गावात झाल्यानंतर गावातील एक महिला देवळाली येथील असल्याने या महिलांनी ही बाब मृताचे मामा बाबासाहेब ढगे (चिंचपूर ढगे) यांना कळवली. त्यानंतर त्यांनी तातडीने सरपंच विशाल ढगे व फिरोज खान यांनी गावातील रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. व वाहून आलेला युवक हा गणेश तांबेच आहे का ही खातर जमा करण्यासाठी पाहणी केली असता. युवकाच्या हातातील दोरा,राखी, चेहरा व उंचीच्या आधारे ओळख पटवण्यात आली. त्यानंतर गणेश तांबे यांचे पार्थिव देवळाली येथे नेण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून तांबे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.