धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय सैन्य दलाने २०१६ मध्ये पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला.या अभिमानास्पद कामगिरीची आठवण ठेवण्यासाठी व माजी सैनिकांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाने दरवर्षी २९ सप्टेंबर हा शौर्य दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.त्या अनुषंगाने यावर्षी सोमवार,२९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत सैनिकी मुलांचे वसतिगृह,धाराशिव येथे शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले. 

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री. दिगंबर इगवे,अधीक्षक,जिल्हा कारागृह धाराशिव उपस्थित होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पांडुरंग मोरे, प्रकल्प अधिकारी,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,धाराशिव यांनी हजेरी लावली.

शौर्य दिन कार्यक्रमाची सुरुवात ‘अमर जवान’ स्मारक प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.श्री. दिगंबर इगवे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, माजी सैनिक व वीरपरिवारांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमात वीर पत्नी,वीर माता-पिता यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.हवालदार महेश रामकृष्ण देशमुख (सेवारत सैनिक) यांचा ३१ जानेवारी २०२५ रोजी सेवे दरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्या आई श्रीमती संगिता देशमुख व वडील श्री. रामकृष्ण देशमुख यांना सैनिक कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडून मंजूर तीन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील ६ वीर पत्नी/वीर पालक,२७ माजी सैनिक व अवलंबित,एनसीसी विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्ग मिळून ६२ जण उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गुरुनाथ कुलकर्णी (वरिष्ठ लिपिक,सैनिक कल्याण कार्यालय) यांनी केले,तर श्री. अनिलकुमार मेंगशेट्टी यांनी आभार प्रदर्शन केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.

 
Top