धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिव येथे २३ सप्टेंबर २०२५ रोजी १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त आठवडाभर वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

१८ सप्टेंबर रोजी "स्थौल्यासाठी आयुर्वेदिक आहार" या विषयावर परिसंवाद घेण्यात आला,ज्यात डॉ.प्रियंका चौरे यांनी मार्गदर्शन केले.तसेच दि.२४ सप्टेंबर रोजी विविध विभागांमार्फत विद्यार्थ्यांसाठी औषधी वनस्पती,व्यसनमुक्ती,प्रकृती परिक्षण व स्किल लॅब प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.

आयुर्वेद दिनानिमित्त स्त्रीरोग व प्रसूती विभागातर्फे "स्वस्थ नारी – सशक्त परिवार" या संकल्पनेखाली शासकीय तंत्रनिकेतन मुलींचे वसतिगृह,शासकीय आयुर्वेद दवाखाना चिलवडी आणि श्री.समर्थगड, समर्थनगर येथे आरोग्य शिबिरे घेण्यात आली.

दि. २३ रोजी सकाळी विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली.रॅलीत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.वीणा पाटील,प्राध्यापकवर्ग तसेच सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले.त्यानंतर चर्चासत्र कक्षात मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.या व्याख्यानात धाराशिव येथील प्रख्यात आयुर्वेद प्रॅक्टीशनर आणि आयुर्वेद व्यासपीठ संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत कोथळकर तसेच डॉ.पल्लवी कोथळकर यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेद विषयक मार्गदर्शन केले.

तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी औषधी वनस्पती,मानवी शरीराचे अवयव, व्यसनमुक्ती व औषधी कल्प यांची माहिती देणारी विशेष प्रदर्शनीही भरविण्यात आली. शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.अधिष्ठाता डॉ.वीणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर चाललेल्या विविध उपक्रमांतून महाविद्यालयात १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


 
Top