धाराशिव (प्रतिनिधी)-  अतिवृष्टाग्रस्त व पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत इ. 10 वी व 12 वी परीक्षा शुल्क माफ करावी अशी मागणी भाजपा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील काही जिल्ह्यात गेले काही दिवस सतत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अतिवृष्टी होऊन नद्या, नाले, ओढ्यांना महापूर येवून सर्वच शेतीपिकांचे, फळबागांचे व पशुधनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरयांचा हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे. तसेच महापूराने नदी, नाले व ओढ्या काठच्या जमिनी खरडून जाऊन अतोनात नुकसान होऊन गावची गावे पाण्यात गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकरी व सामान्य जनता प्रचंड अडचणीत आले आहेत. 

तरी शासनाने धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील पूरग्रस्त भागातील फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत परीक्षांचे आणि 12 वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचे शुल्क माफ करून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

 
Top