तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, त्याचा गैरफायदा घेऊन मोबाईल चोरी व पाकिटमारी करणाऱ्यांचा सुळसुळाट वाढतो. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार 21 व 22 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पायी गस्त घालताना नवीन बसस्थानक व महाद्वार परिसरात संशयितरित्या फिरणारे मोबाईल व पाकिट चोरटे हेरले. त्यानंतर कारवाई करत एकूण 23 जणांना (पुरुष 18 व महिला 7) ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना पोलीस ठाणे तुळजापूर येथे हजर करण्यात आले. आगामी नवरात्र काळात अशा गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, महिला पोलीस हवालदार शैला टेळे तसेच चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव व रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.