तुळजापूर (प्रतिनिधी)-   तीर्थक्षेत्र तुळजापूरात विघ्नहर्ता गणरायाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. शहरातील सर्व संबंधित विभाग, व्यापारी वर्ग तसेच सेवेकरी मंडळी उत्सव याञेच्या पूर्व तयारीत मग्न झाले आहेत.

सोमवारपासून पितृपक्ष पंधरवाडा सुरू झाल्याने दर्शनार्थींची संख्या काहीशी घटते. या कालावधीत हिंदू धर्मानुसार शुभकार्ये टाळली जात असल्याने शहरात तुलनेने शांतता दिसते. याच काळात पुजारी बांधव व व्यापारी वर्ग घरे-दुकानांची दुरुस्ती, रंगरंगोटी, सजावट याकडे लक्ष देतात. मात्र यंदा दुकानांच्या भाड्यात झालेली प्रचंड वाढ व्यापाऱ्यांच्या नाराजीस कारणीभूत ठरली आहे. तरीसुद्धा, गर्दी नसल्याचा फायदा घेत ठोक व्यापाऱ्यांकडून माल ऑर्डर देऊन साठवणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती व सजावटीची कामे हाती घेतली आहेत. छबिना वाहने रंगवणे, वायरींग तपासणी, पञक लावणे, वाटप करणे यांसह मंदिराच्या परिसरात युध्दपातळीवर काम सुरू आहे. महावितरणकडून विद्युत डीपी व वायरिंग दुरुस्ती जलदगतीने केली जात आहे.

पोलिस खात्याने बंदोबस्ताचा नकाशा तयार करून जादा पोलिस बंदोबस्त मागवला आहे. त्यांच्या निवास व भोजनव्यवस्थेची सोय सुरू करण्यात आली असून बॅरिकेटिंगचे कामही सुरू आहे. नगरपरिषदेकडून शहरात स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा, पथदिवे दुरुस्ती, स्वच्छतागृहे व तुरटी यांची सोय करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाकडून उत्सव काळात आवश्यक औषधे व अतिरिक्त आरोग्य कर्मचारी उपलब्ध ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य पथकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. एकंदरीत, विघ्नहर्त्याला निरोप दिल्यानंतर तुळजापूरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला जोर आला आहे. प्रत्येक विभाग, व्यापारी वर्ग व पुजारी बांधव उत्सवयाञेची पूर्वतयारी करत असल्याने लवकरच शहरात नवरात्रोत्सवाचा रंगतदार माहोल अनुभवायला मिळणार आहे.

 
Top