धाराशिव (प्रतिनिधी) -नवरात्र महोत्सव पार्श्वभूमीवर श्री सिद्धीविनायक परिवार तर्फे राबविण्यात येणाऱ्या नवदुर्गा गौरव उपक्रमाचा सहाव्या वर्षी शुभारंभ झाला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या उपक्रमाचा पहिला सन्मान डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख यांना प्रदान करण्यात आला. स्थानिक शाखा व्यवस्थापक व कार्यकर्त्यांच्या शिफारशीनुसार समाजकारण, व्यावसायिक क्षेत्र किंवा प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांची निवड करून त्यांना नवदुर्गा म्हणून गौरविण्यात येते. श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असून, महिलांना समाजजीवनात अधिक सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याला समाजासमोर आदर्शरूपाने मांडणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत अनेक महिलांचा सन्मान या उपक्रमातून करण्यात आला असून, यंदाही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.