तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर 22 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात दररोज महाराष्ट्रातील नामवंत तसेच नवोदित कलाकार आपली कला सादर करत आहेत.रविवारी 28 सप्टेंबर रोजी महोत्सवाच्या व्यासपीठावर स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.कार्यक्रमात प्रथम शाहीर राणा जोगदंड यांनी प्रभावी शाहिरी सादर करून वातावरण भारावून टाकले.त्यानंतर भवानीशंकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विशाल टोले यांच्या सहकाऱ्यांनी रंगतदार नृत्याविष्कार सादर केला.अखिल भारतीय नाट्य परिषद,शाखा धाराशिव यांच्या वतीने विशाल शिंगाडे यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या लोकनृत्याने टाळ्यांचा गजर अन प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन मंदिर संस्थानने स्थानिक कलावंतांना मोठे प्रोत्साहन दिले आहे.
या प्रसंगी नंदा राजेश जगताप यांचा स्त्रीशक्ती गौरव म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला.त्यांना श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्याची माळ,महावस्त्र व अकरा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.नंदा जगताप यांनी आतापर्यंत 5 हजार महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले असून बालविवाह रोखण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले आहे.तसेच दोन गावांत विकली जाणारी दारू बंद करण्यास त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन मंदिर संस्थानतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी स्थानिक कलाकार राणा जोगदंड,विशाल टोले व विशाल शिंगाडे यांचा देखील मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवाच्या या उपक्रमामुळे स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध झाले असून समाजकार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून मंदिर संस्थानने सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.