कळंब (प्रतिनिधी)-  हसेगावचे (केज) चे सुपुत्र जेष्ठ ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांच्यावर  स्वामी विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथे उपचार चालू असताना दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी ठीक 1:30 वाजता वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला .

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कळंब येथे देवमित्रा या निवस्थानी पुनवर्सन सावरगाव येथे ठेवण्यात आले व त्यानंतर त्यांचा अंत्यविधी कळंब येथील परळी रोड येथील स्मशानभूमीत करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रा. कपिल चंदनशिव, एक मुलगी, दोन सुना व तीन नातवंडे असा परिवार आहे.

 इ.10 वी व 12 वी च्या पुस्तकात दीर्घकाळ राहिलेल्या “लाल चिखल“ या शेतकऱ्याच्या आयुष्याचं वास्तव मांडणाऱ्या कथेचे लेखक, ग्रामीण मराठी साहित्यातील प्रसिद्ध कथाकार कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथील मूळ भास्कर देवराव यादव व दत्तक नंतर भास्कर तात्याबा चंदनशिव असे झाले.

त्यांनी जांभळडव्ह (1980), मरणकळा (1983), अंगारमाती (1991), नवी वारूळ (1992), बिरडं (1999) हे त्यांचे प्रचंड गाजलेले मराठी साहित्यातील कथासंग्रह. 28 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आणि 30 व्या अस्मितादर्श मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या साहित्य व संस्कृती महामंडळावर देखील काम केलेले होते. 

महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले होते.अश्या या शेती जीवनाचं आणि शेतकऱ्याच वास्तव आपल्या लेखणीतून मांडणारे महान साहित्यिक  असे भास्कर चंदनशिव हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत.त्यांच्या जाण्याने कळंब तालुका व धाराशिव जिल्ह्यावर  साहित्यिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 
Top