तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव 2025 चा शुभारंभ सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात झाला. पावसाळी वातावरण असूनही प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. तुळजापूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू असतानाही प्रेक्षकांनी उपस्थित राहून महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावली.

प्रेक्षकांच्या सोयीसाठी सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. या सांस्कृतिक महोत्सवाच्या पहिल्या दिवशीची संगीत संध्या गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर व पद्मनाभ गायकवाड यांनी सादर केलेल्या सुरेल गाण्यांनी साजरी झाली.

महोत्सवाचे उद्घाटन सौमय्याश्री पुजार, आमदार प्रवीण स्वामी व तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनीही आवर्जून हजेरी लावली. यावेळी लेखाधिकारी संतोष भेंकी, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे अन्य अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अस्मिता अविनाश सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ, महावस्त्र व अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मंदिर संस्थानच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. अस्मिता सूर्यवंशी या शेवया उत्पादक गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर आणि पद्मनाभ गायकवाड यांचाही मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या कार्यक्रमाने उत्साहाचे वातावरण असून, पुढील नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून भक्ती व संस्कृतीचा संगम अनुभवता येणार आहे.

 
Top