धाराशिव (प्रतिनिधी)- यापूर्वी अशी विदारक परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती. शेती-मातीवर निसर्ग अक्षरशः कोपला आहे. अतिवृष्टीमुळं भूम, परंडा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महापुरामुळे दावणीलाच तडफडून पशुधन मोठ्या प्रमाणात दगावलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. शिवारातील पिकांचं तर होत्याचं नव्हतं झालं आहे. हे अभुतपुर्व नुकसान आहे. त्यामुळं मदतही अभूतपूर्वच असायला हवी. असे मत मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पुढील दोन-तीन दिवसात आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणं, तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमताही आता संपली आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यांकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने परंडा आणि भूम तालुक्यात तातडीने उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यश आले आहे. अहिल्यानगर येथून सैन्य दलाचे पथकही दाखल होत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तुळजापूर आणि परिसरातील परिस्थितीची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
या अतिवृष्टीमुळं शेतकरी बांधवांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला आहे. शेतकरी अन् सर्वसामान्य नागरिकही गंभीर आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडले आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करून झालेल्या नुकसानपोटी शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अन् संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा. संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दरम्यान कोणतीही बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास आपण स्वतः आणि जिल्हा प्रशासन मदतीसाठी तत्पर आहोत. तातडीच्या मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल. काहीही अडचण असल्यास आपण मला थेट 9820289732 या क्रमांकावर मेसेज करा किंवा माझे स्वीय सहायक जयेश कदम (मो. 9881165511), इंद्रजीत शेळके (मो. 9226525511), रविराज चौगुले (मो. 7447285511) यांनाही आपण संपर्क करू शकता. त्यासोबतच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर प्रशासनाशी संपर्क साधू शकता.. असे आवाहन 'मित्र'चे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी केले आहे.
9657576714 - डॉ मृणाल जाधव तहसीलदार, धाराशिव, 7776889999 - अरविंद बोळंगे, तहसीलदार, तुळजापूर, 9881745577 - हेमंत ढोकळे, तहसीलदार, कळंब, 9823722274 - जयवंत पाटील, तहसीलदार, भूम, 8208513656 - निलेश काकडे तहसीलदार, परंडा, 9096255737- प्रकाश म्हेत्रे, तहसीलदार, वाशी, 9422469013 - गोविंद येरमे, तहसीलदार, उमरगा, 7875243834 - रणजीत कोळेकर, तहसीलदार, लोहारा.