तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील शुक्रवार पेठ भागातील जिजामाता नगर मधील दिगंबर वसंत काचोळे (वय 55, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी मराठा समाजाला नुकतेच शासनाकडून मिळालेल्या आरक्षण टिकेल की नाही या भीतीतून आपल्या राहत्या घरात सोमवारी राञी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि दिगंबर काचोळे हे पत्नी निधनानंतर आई व चार मुलांसह (समर्थ 10, काजल 17, नयन 15, एश्वर्या 9) स्वतंत्र राहत होते. मोलमजुरी करून संसार चालवत असताना आरक्षणाच्या निर्णयामुळे ते आनंदी झाले होते.05 सप्टेंबर रोजी स्थानिक गणेशोत्सव मंडळाबरोबर आरक्षण मिळाल्याचा आनंद त्यांनी समाजबांधवांसह साजरा केला. मात्र, 07 व 08 सप्टेंबर रोजी टीव्ही वर “आरक्षण धोक्यात“ अशा बातम्या वारंवार झळकत होत्या. त्यातूनच ते नाराज होऊन कुटुंबीयांशी “आरक्षण टिकेल का नाही?” अशी खंत व्यक्त करीत होते. अखेर त्यांनी या नैराश्यातुन राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयाञा संपवली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रेत खाली उतरवून तुळजापूर येथील सरकारी दवाखान्यात हलवले.
मृताचा भाऊ विश्वंभर काचोळे यांनी पोलिसात दिलेल्या जबाबात कोणावरही संशय व्यक्त केला नाही. आरक्षणाबाबतच्या राजकीय अनिश्चिततेने समाजातील बांधवांना नैराश्यात ढकलून जीव द्यायला भाग पाडले. शासन याकडे गांभीर्याने पाहणार का? असा प्रश्न होत आहे.
