वाशी (प्रतिनिधी)- येथील कर्मवीर भाऊराव पाटील जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., वाशी ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. नेहमीप्रमाणे या सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव व सर्व सभासदांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येते.
मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेला “गोरगरीब व दुर्बलांची सेवा“ हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, सर्व सभासदांनी एकमुखाने महत्त्वाचा निर्णय घेतला. स्नेहभोजनाचा खर्च टाळून तो थेट पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दान करण्याचे ठरवले.
या निर्णयानुसार तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष मोळवणे सर यांच्या संकल्पनेतून, पतसंस्थेचे चेअरमन राजेश ढेंगळे, सचिव संगपाल सुकाळे, उपाध्यक्ष राजकुमार गुंजाळ, अधिकृत पंच वागीश स्वामी, तज्ञ संचालक कल्याण सुरवसे, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर भालेकर तसेच सर्व संचालक व सभासदांच्या उपस्थितीत 51 हजारांचा धनादेश मा. तहसीलदार वाशी श्री प्रकाश म्हेत्रे यांना सुपूर्त करण्यात आला.
तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांचे मनोगत
“शेतकरी हा आपल्या अन्नदात्यासमान आहे. त्याच्या संकटाच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने मदतीचा हात पुढे करणे ही खरी समाजसेवा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेने दाखवलेला हा आदर्श उपक्रम खरंच कौतुकास्पद असून, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नवा विश्वास निर्माण होईल. ही मदत पूरग्रस्तांना दिलासा देणारी ठरेल,” असे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले.