तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेत्र तुळजापूरासह संपूर्ण तालुक्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे देविभक्तांपासून बळीराजापर्यंत सर्वांचीच दैना उडाली आहे. शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन आणि खरीप पिकांची काढणी, दोन्ही अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. 

तुळजापूर तालुक्यात प्राथमिक अंदाजा नुसार तालुक्यात 39,850 हेक्टरवरील पिके व फळबागांना फटका, 37 हजार शेतकरी प्रभावित, 6 कच्ची घरे जमीनदोस्त, 8 जनावरे मृत्यूमुखी, 6 तलाव-रस्त्यांचे मोठे नुकसान हा प्राथमिक अंदाज आहे. या पेक्षा किती तरी पटीने न भरुन येणारे नुकसान ऐण सणसुदी काळात झाल्याने या अस्मानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. तो शासनाच्या मदतीशिवाय उभारी घेवुच शकणार नाही. भरीव मदतीचा हात नाही मिळाला तर अनेक शेतकरी कुंटुंब रस्त्यावर येवुन त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही. तालुक्यातील सातपैकी सहा सर्कल अतिवृष्टीग्रस्त घोषित केले आहे. त्यात तुळजापूर, जळकोट, नळदुर्ग, मंगरुळ, काटगाव, सावरगाव फक्त सलगरा दि सर्कल अजुन अतिवृष्टीत आले नाही.                                                             


शेतकऱ्यांची आर्त हाक

गेल्या आठ दिवसांपासून शेतात जाणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे कसे होणार? नुकसानाचे फोटो तरी काढायचे कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यंदाच्या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो एक-दोन दिवसाचा नव्हे तर सलग अनेक दिवसांचे नुकसान करणारा पाऊस आहे.                                                                          


जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले की, नुकसानीचे पंचनामे गतीने सुरू असून भरपाईसाठी निधीची मागणी शासनाकडे केली जाणार आहे. ऑगस्टमधील अनुदानाचे वाटपही आजपासून सुरू झाले आहे.


अतिवृष्टीमुळे लोकप्रतिनीधी देवीदर्शन टाळले 

दरवर्षी शारदीय नवरात्र म्हटले की श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षप्रमुख, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदारांची अक्षरशः “रीघ“ लागते. देविदर्शन हा जणू राजकीय सोहळाच ठरतो. मात्र यंदा चित्र वेगळे आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना नेत्यांच्या भेटी-गाठी मतदारांना “दिसतील“ या भीतीने एकही मोठा नेता तुळजापूरच्या दिशेने फिरकला नाही. “शेतकऱ्यांच्या दुःखात तुम्ही देवीदर्शनाला?” हा मतदारांचा प्रश्न टाळण्यासाठी यंदा राजकीय दर्शनमंडळ गायब झाले.


 
Top